कोलाड । विश्वास निकम
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड रेल्वे पुलाखाली असलेल्या गोदी नदीवरील पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यात काल एका दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात घडला. सुदैवाने पाठीमागून कोणतीही गाडी न आल्यामुळे तो थोडक्यात बचावला. मात्र, या खड्ड्यामुळे एखादा नाहक बळी गेला तर त्यास जबाबदार कोण, असा संतप्त प्रश्न प्रवाश्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई–गोवा महामार्ग ६६ वरील कोलाड गोदी नदीवरील पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. पुलाच्या काठड्यांचे काम नुकतेच करण्यात आले असले तरी जुनाच पूल दुरुस्त न केल्याने प्रश्न कायम आहे. “फक्त काठडे बांधून पूल नवीन दाखविण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा सवालही प्रवासी वर्गातून केला जात आहे.
या महामार्गावरून दररोज शाळा, कॉलेज, पॉलिटेक्निकमधील विद्यार्थी, बाजारपेठेत जाणारे ग्रामस्थ, धाटाव एमआयडीसीकडे जाणारे कामगार तसेच मुंबई–गोवा दरम्यान धावणारी मोठ्या प्रमाणावरची वाहने ये-जा करत असतात. पावसाळ्यात हा खड्डा पाण्याने भरला जातो आणि वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने मोठ्या अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १७–१८ वर्षे रखडले आहे. लोकप्रतिनिधींकडून वारंवार नवी डेडलाईन दिली जाते, पण प्रत्यक्षात काम अपूर्णच आहे. कोलाड बाजारपेठेतील उड्डाणपूल अर्धवट अवस्थेत आहे तर रस्त्यालगत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
