सोशल मीडियावर नागरिकांचा संताप – “४० लाखांचे वाहन आता ४० हजारात विकले जाणार का?” असा सवाल
कर्जत । गणेश पवार
कर्जत नगरपरिषदेने करदात्यांकडून वसूल केलेल्या पैशातून तब्बल ४० लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक रोड क्लिनर वाहन खरेदी केले होते. या वाहनाचा उपयोग शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी होणार होता. मात्र या वाहनाचा प्रत्यक्षात शहरात वापर झाल्याचे नागरिकांच्या नजरेस कधीच पडले नाही. सध्या हे वाहन भिसेगाव येथील डंपिंग ग्राऊंडवर गंज खात उभे असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली असून “४० लाख रुपये खर्च करून घेतलेले वाहन आता ४० हजारात विकले जाणार का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
डेमोपुरतेच दर्शन
सदर वाहन खरेदी झाल्यानंतर त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुकाचे गोडवे गायले होते. काही दिवस डेमो स्वरूपात नागरिकांना हे वाहन दिसले, मात्र नंतर शहरातील रस्त्यांवर रोजच्या स्वच्छतेसाठी फक्त सफाई कामगारच दिसू लागले. करदात्यांच्या पैशातून खरेदी केलेले हे अत्याधुनिक वाहन मात्र नागरिकांना पुन्हा कधीच दिसले नाही.
प्रशासनाकडून उत्तर नाही
काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे या वाहनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. उलट, हे वाहन सध्या डंपिंग ग्राऊंडवर उभे असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इतरही प्रलंबित मुद्दे
नगरपरिषदेची इमारत शासनाच्या निधीतून बांधून देखील ती नागरिकांच्या सोयीसाठी न वापरता, स्टेट बँकेला भाड्याने देण्यात आल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “नगरपरिषद प्रशासन हे ‘आडंळ दळतय आणि कुत्रं पिठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.”
निवडणुकीत मुद्दा ठरण्याची शक्यता
४० लाख रुपये खर्च करून घेतलेले वाहन भंगारात उभे राहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत हा मुद्दा प्रमुख ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
