पेण । विनायक पाटील
पेण तालुक्यात रायगड जिल्ह्यातील पहिला अमृत मेळावा पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार, दि. १४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विद्यमाने हा मेळावा घेण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, सिंधी, कच्छी, पाटीदार, राजपूत आदी प्रवर्गासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ॲड. बापूसाहेब नेने तसेच बँक ऑफ इंडिया, पेण शाखेचे व्यवस्थापक सौरभ पणशीकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यामध्ये व्यवसाय, उद्योग, शैक्षणिक कर्ज, विविध लाभ योजना याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक ॲड. मंगेश नेने यांनी केले आहे.
