जनसुरक्षा कायद्यामुळे मूलभूत हक्क धोक्यात – आंदोलनकर्त्यांचा आरोप
कोलाड । विश्वास निकम
पाशवी बहुमताच्या जोरावर विधानसभेत मंजूर करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा तसेच फक्त भांडवलदारांच्या फायद्याचा असल्याचा आरोप करत विरोधक व कष्टकरी जनतेने रोह्यात एल्गार केला. या कायद्यामुळे सरकारला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि आंदोलन करण्याचा मुलभूत हक्क धोक्यात येणार असल्याने तो रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), माकप, भाकप, सर्वहारा जनआंदोलन आणि भारत जोडो अभियान या सर्व घटक पक्ष व संघटनांच्या वतीने बुधवार, दि. १० सप्टेंबर रोजी रोह्यात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला. कष्टकरी वर्गानेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करा”, “संविधान बचाव”, “बचेंगे तो जीतेंगे”, “आपला लढा न्याय हक्कासाठी” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पदयात्रा संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.
या प्रसंगी रोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील देशमुख, सर्वहारा जनआंदोलनाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान सुतार, वाघमारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे तालुका प्रमुख नितिन वारंगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष तुषार खरिवले, कोलाड विभाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिओम टाळकुटे, रोहा तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष फैसल अधिकारी, रोहा तालुका पर्यावरण सेलचे अध्यक्ष मारुती फाटक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
