स्थानिक नेते, अधिकारी मौनात – आर्थिक लागेबांध्यांचा संशय
उरण । घन:श्याम कडू
उरण येथील तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) एलपीजी प्रकल्पात सोमवारी झालेल्या भीषण स्फोटाने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी, स्फोटाच्या वेळी कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या स्फोटाचे हादरे इतके प्रचंड होते की नागाव, म्हातवलीसारख्या गावांपर्यंत घरातील भांडी-कपाटे खाली पडली. नागरिक घाबरून रस्त्यावर आले. मात्र, एवढ्या मोठ्या घटनेनंतरही ओएनजीसीचा सायरन वाजला नाही, पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला नाही आणि नेहमीप्रमाणे अधिकारी व स्थानिक नेते गप्पच राहिले.
२०१९ मध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या गॅसगळतीत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. नागावपर्यंत ज्वाला पसरल्या होत्या. तरीसुद्धा त्या घटनेतसुद्धा गुन्हा नोंदवला गेला नव्हता. आतापर्यंत झालेल्या अपघातांत मृत्यू, जखमी, लाखोंचे नुकसान झाले, परंतु एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही, एकाही नेत्याने ठोस पावले उचलली नाहीत.
ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तसेच गावातील तथाकथित नेते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी हे सर्वच गप्प आहेत. यावरून ओएनजीसीशी असलेल्या आर्थिक लागेबांध्यांमुळेच त्यांचा मौनसहवास असल्याचा संशय नागरिकांत व्यक्त होत आहे. चारफाटा–ओएनजीसी रस्ता खड्ड्यांनी पोखरलेला असून त्याचीही दुरुस्ती होत नाही, यावरून कंपनीच्या बेफिकीरीचा प्रत्यय येतो.
शनिवारी आग लागून दोन कामगार भाजले, काही दिवसांपूर्वी एका कामगाराचा मृत्यू झाला, आणि सोमवारी पुन्हा स्फोट झाला. तरीदेखील पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल नाही. येथील एक वरिष्ठ अधिकारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने प्रकरण जाणीवपूर्वक दडपले जात असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.
हा स्फोट केवळ प्रकल्पातीलच नाही, तर प्रशासन, राजकारण आणि व्यवस्थेतील मस्तवालपणाचाही आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सुरक्षा यंत्रणा मजबूत केली नाही, तर उरणकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, ओएनजीसी प्रशासनाने “स्फोट झाला नसून केवळ आग लागली” असे सांगत परिस्थिती सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर तहसीलदारांनी घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आजवर तालुक्यात घडलेल्या अशा घटनांबाबत कोणावरही कारवाई झाली नसल्याने नागरिकांच्या मनातील प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.
