माणगाव । सलीम शेख
माणगाव ते कोस्ते बुद्रुक या मार्गावर जेटीएल प्रा. लि. कंपनीसाठी अवजड कंटेनर वाहतूक केली जाते. हे कंटेनर कॉईल घेऊन जाणारे असून, त्यांची सततची वाहतूक स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अरुंद रस्ता, अवघड वळणं आणि खराब देखभालीमुळे हे कंटेनर अनेकदा मध्यरस्त्यात बंद पडतात. परिणामी संपूर्ण वाहतूक ठप्प होते आणि अपघाताचा धोका निर्माण होतो.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची परिस्थिती दिवसातून अनेक वेळा उद्भवते. कंटेनर रस्त्यावर बंद पडल्यामुळे शालेय बसेस, रुग्णवाहिका आणि छोट्या वाहनांना गंभीर अडथळा निर्माण होतो. आपत्कालीन सेवांना वेळेत पोहोचता येत नाही, यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांची मागणी आहे की, जेटीएल कंपनीने नादुरुस्त वाहने वापरण्यास बंदी घालावी. कंटेनर व्यवस्थित दुरुस्त करूनच रस्त्यावर सोडावेत. अरुंद रस्ता आणि अवघड वळणांमुळे अनेकदा कंटेनर पलटी होतात किंवा बिघडतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दिघी पोर्ट–माणगाव–निजामपूर–पुणे–बेंगलोर हा महत्त्वाचा वाहतुकीचा मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक, प्रवासी व मालवाहतूक होते. मात्र, एखादे वाहन बंद पडले किंवा अपघात झाला, तर तात्काळ वाहतूक कोंडी निर्माण होते. दुर्दैवाने, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी कोणताही ठोस बंदोबस्त केला जात नाही.
स्थानिकांचा ठाम आग्रह आहे की, या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवावा. तसेच कंपनीने योग्य देखभाल न केलेले कंटेनर रस्त्यावर आणू नयेत. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी चर्चा सुरू आहे.
सध्या ही समस्या केवळ “वाहतूक कोंडी” म्हणून हलक्यात घेतली जात असली तरी प्रत्यक्षात ती गंभीर सुरक्षा धोक्याची घंटा आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
