• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भेंडखळ येथे बीपीसीएलसमोर वाहनांच्या रांगा

ByEditor

Sep 11, 2025

क्लिनर सक्तीच्या नियमामुळे ट्रक चालकांचा संप – तहसीलदारांच्या मध्यस्थीने तोडगा

उरण । अनंत नारंगीकर
उरणजवळील भेंडखळ गावाजवळ असलेल्या बीपीसीएल प्रकल्पात गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकांना सहाय्यक (क्लिनर) नसल्यास प्रवेशबंदी करण्यात आल्याने गुरुवारी (दि. ११) ट्रक मालक व चालकांनी गाड्या बंद ठेवल्या. परिणामी बीपीसीएल प्रकल्पाच्या रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार कोणत्याही सरकारी प्रकल्पात क्लिनरशिवाय वाहनास प्रवेश दिला जात नाही. त्यानुसार बीपीसीएल प्रशासनाने प्रकल्पात येणाऱ्या सर्व गाड्यांवर क्लिनर असणे सक्तीचे केले. मात्र, ट्रकचालकांनी या नियमाला विरोध दर्शवला. त्यांच्या मते, मिळणाऱ्या भाड्यातून वाहनाचा खर्च, चालक व क्लिनर दोघांचा पगार भागवणे शक्य नाही. त्यामुळे १२ ट्रान्सपोर्टर कंपन्यांनी एकत्र येऊन संप पुकारला.

या संपामुळे गॅस वितरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार डॉ. उद्धव कदम आणि उरण पोलिसांनी तातडीने बीपीसीएल प्रशासन व वाहतूकदार कंपन्यांची बैठक बोलावली. चर्चेनंतर क्लिनरची सक्ती तातडीने लागू न करता काही मुदत देण्यात आली. परिणामी वाहतूकदारांनी संप मागे घेतला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली.

उरण तालुक्यात जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएलसह अनेक रासायनिक व तेल साठवणूक कंपन्यांमुळे रोज हजारो अवजड वाहने धावत असतात. परंतु यातील ९५ टक्के वाहनांवर क्लिनर नसतात. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन जीवितहानी होते. वाहतूक विभागाच्या नियमानुसार प्रत्येक अवजड वाहनावर क्लिनर असणे बंधनकारक आहे. नियम मोडल्यास १५०० रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र उरणमध्ये हा नियम सर्रास मोडला जातो. विशेष म्हणजे जेएनपीटीत वाहनांवरील क्लिनरना प्रवेशद्वारावरच उतरवले जाते.

या नियमभंगाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी उरण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!