उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत तटकरे कोणावर निशाणा साधणार याकडे लक्ष
मुंबई | मिलिंद माने
रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रोहा येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचे नाव वगळल्याने जिल्ह्यात शह-काटशहाचे राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायगडात विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सतत पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांनी वारंवार तटकरे कुटुंबावर टीका केली. याच कारणास्तव अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद नाकारण्यात आले असून हे पद गेल्या वर्षभरापासून रिक्तच आहे.
रोहा येथील डॉ. चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रिकेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा उल्लेख आहे. मात्र अलिबाग-मुरूड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, मंत्री भरत गोगावले, शिक्षक मतदारसंघाचे म्हात्रे आणि पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांची नावे जाणूनबुजून वगळल्याचे बोलले जात आहे.
या निमंत्रणपत्रिकेत तटकरे घराण्याला प्राधान्य मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे नेमके कुणावर तोफ डागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर रायगडातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग येण्याची चिन्हे आहेत.
