रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत वाढ झाल्यानंतर एकाही राजकीय पक्ष वा नागरिकांकडून हरकत किंवा तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे झिरो तक्रारी असलेली एकमेव नगर परिषद म्हणून उरणची नोंद झाली असून अंतिम प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
उरण । अनंत नारंगीकर
उरण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत वाढ झाल्यानंतर एकही हरकत किंवा तक्रार नोंदवली गेली नसल्याची माहिती उरण नगर परिषदेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील झिरो तक्रारी असलेली एकमेव नगर परिषद म्हणून उरणची चर्चा सुरू झाली आहे.
उरण नगर परिषदेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी सुमारे १७ हजारांहून अधिक मतदारसंख्या असलेल्या नगर परिषदेत ९ प्रभागांमधून १८ सदस्य आणि नगराध्यक्ष अशी निवड होत होती. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार नगराध्यक्ष वगळता प्रभागांची संख्या तीनने वाढून २१ इतकी झाली आहे.
नगर परिषदेने या प्रारुप आराखड्यावर हरकती व तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले होते. यासाठी फलक लावून सार्वजनिकरित्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र निर्धारित मुदतीत कोणत्याही राजकीय पक्ष, स्थानिक नेते वा नागरिकांकडून हरकत किंवा तक्रार दाखल झालेली नाही.
याबाबत बोलताना उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव म्हणाले, “प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नागरिकांनी हरकत नोंदवली नाही. त्यामुळे नगर परिषदेचा अंतिम प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.”
