उरण । घनःश्याम कडू
उरण-करंजा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची पाठराखण केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या कामाचा ठेकेदार हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून, राजकीय दबावामुळे शासकीय अधिकारी कारवाई टाळत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला खुले संरक्षण मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाळ्यानंतर सुरू झालेल्या या कामात ठेकेदाराकडून नियमांचा भंग करून निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप आहे. परिणामी अवघ्या काही दिवसांतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, करंजा परिसरातील ग्रामपंचायतीसह इतर शासकीय कामांतही अशाच प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उरण पंचायत समितीकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, उलट अधिकारी वर्ग ठेकेदारांचीच पाठराखण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
