महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार; नेत्रतज्ञांच्या प्रयत्नांना यश
म्हसळा । वैभव कळस
डेरवण (तालुका चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. हा अवयव म्हणजे डोळ्याचे बुबूळ (कॉर्निया) असून, नेत्रतज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
३ सप्टेंबर रोजी रुग्णालयातील आयसीयूमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी नेत्रदान करण्याची तयारी दर्शवल्याने नेत्रशल्यचिकित्सक डॉ. प्रियांका पाटील आणि सहकाऱ्यांनी दोन्ही डोळे संकलित केले. त्यानंतर गरजूंना संपर्क साधून, एका दीर्घकाळ अंध असलेल्या रुग्णाची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
सदर रुग्णाच्या डाव्या डोळ्याचा कॉर्निया पूर्णपणे अपारदर्शक झालेला होता, तसेच गंभीर अवस्थेतील मोतीबिंदूही झाला होता. त्यामुळे ११ सप्टेंबर रोजी कॉर्निया प्रत्यारोपणासोबत मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही करणे आवश्यक होते. नेत्रशल्यचिकित्सक डॉ. मनीषा वाघमारे यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. त्यांना डॉ. सागर पाटील, डॉ. भूषण इंगवले यांचे सहकार्य मिळाले. भूलतज्ञ डॉ. लीना व टीमनेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नेत्रदान कसे करावे?
- मृताचे डोळे पूर्ण बंद करून त्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी.
- मृताचे डोके उंच करून उशीवर ठेवावे.
- खोलीतील पंखे बंद ठेवावेत.
- मृत्यूनंतर तात्काळ डॉक्टरकडून मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधावा.
नेत्रदानाचे उपयोग
- कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी
- बुबुळावरील जखमांवर पॅचिंगसाठी
- वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी
नेत्रदान कोण करू शकत नाही?
ज्या व्यक्तींचा मृत्यू कावीळ, रक्तातील जंतुसंसर्ग, एड्स, सर्पदंश, मेंदूज्वर, ब्लड कॅन्सर यांसारख्या आजारांमुळे झाला असेल त्यांचे नेत्र प्रत्यारोपणासाठी वापरता येत नाही. मात्र, त्यांचे डोळे संशोधनासाठी उपयुक्त ठरू शकतात.
