रानसई–चिर्ले रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला लवकरच सुरुवात
अनंत नारंगीकर
उरण, दि. १८ : रानसई ते चिर्ले या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून बुधवारी (दि. १७) पासून सुरू केली आहे. या मोहिमेमुळे दिघोडे चौक मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जेएनपीटीच्या अनुषंगाने उरणच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कंटेनर सीएफएसचे जाळे उभे राहिले आहे. परिणामी, रानसई–चिर्ले तसेच दिघोडे–चिरनेर रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. या वाहनांमुळे रस्त्यांची दुरावस्था होऊन मोठे खड्डे पडले, अपघात वाढले आणि वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली. विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्ण यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हा मार्ग अद्ययावत व्हावा अशी मागणी सातत्याने स्थानिकांकडून केली जात होती.

ही मागणी लक्षात घेऊन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून शासनाच्या हॅम योजनेतून रानसई धरण–चिर्ले रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी तब्बल ४१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली असून ठेकेदाराची नेमणूक झाली आहे.

दरम्यान, हा रस्ता पूर्वी एमआयडीसीच्या मालकीचा होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले. या अतिक्रमणामुळे कामाला अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मे. पी.पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदार कंपनीमार्फत पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरू केली आहे.
या कारवाईनंतर दिघोडे चौक मोकळा झाल्याने येत्या काही दिवसांत रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण वेगाने होणार असून नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
