महाड ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस टंचाई; जखमींना उपचारासाठी ३० किमी दूर माणगावात हलवले
महाड | मिलिंद माने
महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने चार ग्रामस्थांना चावा घेतला. यात धोंडू तांबडे, सनी खेडेकर, मालती पवार आणि आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमींना तत्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांच्या मदतीने त्यांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास हे रुग्ण माणगाव येथे दाखल झाले.
महाडसारख्या मोठ्या तालुका रुग्णालयात रेबीजसारखी मूलभूत लसही उपलब्ध नसणे हा गंभीर प्रकार असून, यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. केवळ रुग्णालयांच्या इमारती बांधून जनतेची दिशाभूल केली जाते, परंतु वैद्यकीय अधिकारी व औषधांचा पुरेसा साठा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.
