• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणचा रिक्षावाला ठरला ‘माणुसकीचा हिरो’; रुग्णाची ४० हजार रुपयांची थैली केली परत

ByEditor

Sep 20, 2025

उरण । घनःश्याम कडू
आजच्या पैशाच्या गर्दीत माणुसकी गमावल्याचा काळ पाहता, उरणमधील रिक्षावाल्याने प्रामाणिकपणाचा झेंडा फडकावल्याचे उदाहरण समोर आले आहे. जसखार गावातील एक रुग्ण उपचारासाठी उरणमधील डॉ. सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात आला होता. उपचाराच्या गडबडीत त्याची ४० हजार रुपयांनी भरलेली थैली हरवली.

हतबल रुग्णाच्या छातीत धडधड सुरू… डोक्यावर हात, डोळ्यात पाणी! एवढ्या पैशाचा पत्ता नाही, आणि रिक्षावाल्याचं नाव-नंबरसुद्धा आठवत नाही. क्षणात माणसाचं जगणं उद्ध्वस्त होईल असं चित्र उभे राहिले. रुग्णाला वाटले की थैली परत मिळणे तर दिवास्वप्नासमान आहे. पण याचवेळी ‘उरणचा सवंगडे’ नावाचा रिक्षावाला देवदूत ठरला.

नंदकुमार सवंगडेंना लक्षात आले की प्रवासी त्यांची थैली विसरून गेला आहे. गरीब असूनही लालच न करता त्यांनी थैली तशीच उचलली आणि थेट रुग्णालयात जाऊन रुग्णाला परत केली. भरलेल्या थैलीकडे पाहूनही त्यांच्या डोळ्यात लालचाची सावली आलेली नाही. गरीबी असूनही त्यांनी प्रामाणिकपणाचे धाडस दाखवले.

आजच्या समाजात पैशावर माणूस विकत मिळतो, पण सवंगडेंनी त्यावर लाथ मारून माणुसकी जिवंत ठेवली. त्यांच्या या कृतीमुळे ‘माणुसकीचा हिरो’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

याप्रामाणिकपणाचा सन्मान उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केला. डॉ. सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात, संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, सचिव अजित पाटील, ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत आदी उपस्थित राहून नंदकुमार सवंगडेंना सन्मानचिन्ह देऊन गौरवले.

लोकांच्या मनात रिक्षावाल्यांचा उल्लेख होताच ‘उद्धटपणा, लूटमार, अरेरावी’ असे शब्द घुमतात. मात्र नंदकुमार सवंगडेंनी या प्रतिमेला चिरडून टाकत आजही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवले आहे. उरणच्या रिक्षावाल्याच्या या प्रामाणिकपणाने समाजात माणुसकीची आशा पुनःप्रज्वलित केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!