३ मीटर जळून खाक; गावात वीजपुरवठा ठप्प, महावितरणवर संताप
शशिकांत मोरे
रोहा/धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव विभागातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील महादेव वाडीत शनिवारी सकाळी भीषण घटना घडली. स्मार्ट मीटर बॉक्समधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच पेट घेऊन तीन स्मार्ट मीटर जळून खाक झाले. या घटनेमुळे गावात घबराट पसरली व वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला.
सजग ग्रामस्थांनी वेळीच परिसर सुरक्षित केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र महावितरणचे कर्मचारी बराच वेळ घटनास्थळी हजर झाले नाहीत. अखेर ग्रामस्थांच्या पुढाकाराने तळाघर येथील कर्मचारी दत्ता शिर्के घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुख्य लाईन बंद करून आग विझवली. पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले होते.
या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणवर थेट टीका केली. “भरमसाठ वीजबिलांचा त्रास आधीच सहन करावा लागत आहे. त्यात जीव धोक्यात घालणारे स्मार्ट मीटर ही नवीन डोकेदुखी आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाच्या वायरी वापरल्यामुळेच आगीचा धोका वाढला, असा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला. “या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
घटनेमुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
दरम्यान, या संदर्भात महावितरणचे धाटाव विभागीय अभियंता धिरज यादव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महादेव वाडीत लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे झाली होती. मीटर काही प्रमाणात जळाले असले तरी आमच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या घरमालकांचे मीटर जळाले आहेत त्यांना विभागाच्या माध्यमातून नवीन मीटर बसवण्यात येतील.”
