सराईत आरोपी जेरबंद, सोन्याची चैन व रोकड हस्तगत
उरण । घनश्याम कडू
उरण शहर हादरवणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करत उरण पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाडी दाखवली आहे. अल्पावधीतच तपासाचा तांत्रिक मागोवा घेत पोलिसांनी सराईत आरोपींना जेरबंद करत चोरी गेलेला मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे साधारण १.१० वाजता वाणी आळी येथे राहणारे फिर्यादी सुबोध अप्पन्ना राव (वय ५६) यांच्या घरात दोन अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील लोकांना दमदाटी करून त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच घरातील रोकड रक्कम असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर उरण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. २४७/२०२५ भा. दं. सं. कलम ३०९(४), ३३३, ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा सक्रिय झाली. पोलीस उप आयुक्त, परि. २, पनवेल तसेच सहायक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक कार्यरत झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या देखरेखीखाली पोउपनि. राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासासोबत गुप्त माहितीचा आधार घेत आरोपींचा माग काढला आणि अत्यंत अल्पावधीत या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. त्यात सोन्याची चैन किंमत ७२ हजार रुपये, रोकड १४ हजार रुपये असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहित गोपाळ कोहली (वय २६, मूळ राहणार – कॅम्पस रोड, गल्ली क्र. ६, धनगरी शहर, कैलाली, नेपाळ) व स्वप्नाली हरिश्चंद्र पाटील (वय २६, राहणार – नवघर, ता. उरण, जि. रायगड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी मोहित कोहली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तब्बल अकरा जबरी चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत नोंद आहेत.
उरण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा धाक पुन्हा अधोरेखित झाला असून, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दल किती सजग आहे याची प्रचिती नागरिकांना आली आहे.
