भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवास उत्साहपूर्ण प्रारंभ
रोहा/धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामस्थांचे आराध्य दैवत, ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराज यांच्या नवरात्रोत्सवाला आज सोमवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. विधिवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार आणि “सोनारसिद्ध महाराज की जय”, “हर हर महादेव” या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणवर्गाच्या उपस्थितीत श्री सोनारसिद्ध महाराजांची घटस्थापना करण्यात आली. यावेळी गावात भक्तिमय व धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

धार्मिक विधी व पारंपरिक वातावरण
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आश्विन शुद्ध प्रतिपदा या पावन तिथीला ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराजांची घटस्थापना करण्यात आली. धाटाव येथील तलावालगत निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या भव्य मंदिरात हा सोहळा पार पडला. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरव, वेताळ, विष्णु, वीरभद्र, नंदीभृगि, स्कंद व वृषभ अशा शिवगणांसह सोनारसिद्ध महाराजांची मूर्ती विराजमान आहे.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत मालुसरे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तसेच प्रकाश जंगम व दिगंबर जंगम यांच्या मंत्रपुष्पांजली व पूजाविधीनंतर देवाला घटी बसविण्यात आली. गावकऱ्यांनी एकसुरात देवाला प्रार्थना अर्पण करत – “हे सोनारसिद्ध महाराजा, हा उत्सव आम्ही तुझ्या श्रध्देने आणि परंपरेने साजरा करीत आहोत. काही चुका झाल्या तरी कृपादृष्टीने त्यांना माफ कर. गावावर संकटे येऊ देऊ नकोस” – अशा भावपूर्ण गाऱ्हाण्यांसह अक्षता उधळून मंगलमय वातावरण निर्माण केले.
वाद्य, घंटानाद आणि भक्तिरस
सोहळ्यावेळी विविध वाद्यांच्या निनादासह घंटानादाने संपूर्ण परिसर दुमदुमला. “आरती ओवाळू माझ्या सोनारसिद्ध महाराजा…” आणि “कृपा दृष्टी असूदे देवा, सुखी ठेव प्रजा” या आरत्या ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने सादर केल्या. महाआरतीदरम्यान उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत भक्तिभाव दाटून आला होता.
ग्रामस्थांचा उत्साह, मंडळाची तयारी
या नवरात्रोत्सवाच्या आयोजनासाठी सोनारसिद्ध ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग व महिला वर्ग गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहेत. ग्रामदैवताच्या सेवेत प्रत्येक जण आनंदाने सहभागी होत असून संपूर्ण गाव उत्सवाच्या तयारीत गुंगले आहे. मंदिरात दर्शनासाठी आणि घटस्थापनेच्या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
श्रद्धा, परंपरा आणि एकजूट
धाटाव ग्रामस्थांसाठी हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, परंपरा आणि गावातील एकतेचे प्रतीक आहे. ग्रामदैवताच्या कृपाशिर्वादाने गाव सुख-समाधानात राहावे, समृद्धी नांदावी अशी प्रार्थना प्रत्येक भक्ताच्या ओठांवर होती. मंगलमय वातावरणात झालेल्या या घटस्थापना विधीनंतर सोनारसिद्ध महाराजांच्या नवरात्रोत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला आहे.
