रायगड : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत येथे आयोजित सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी थोरवे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
कार्यक्रमादरम्यान शेळके म्हणाले, “जर तुम्हाला आमच्या नेत्यांचा मान ठेवता येत नसेल, तर तुमची युती तुमच्यापाशी, आम्ही आमचं बघू. बघूया काय होतंय ते. आम्हालाही वेगळ्या भाषेत बोलता येतं, सोशल मीडियावर कमेंट करायला माणसं ठेवता येतात. परंतु आम्ही अद्याप आदराची भाषा वापरली आहे. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर करतो, पण तुम्ही आमच्या नेत्यांचा आदर राखत नसाल, तर आमच्यासाठी युती टिकवण्याला काही अर्थ उरणार नाही.”
या वक्तव्याने उपस्थितांमध्ये क्षणभर खळबळ उडाली. अप्रत्यक्षपणे महायुती तोडण्याची भाषा करून शेळके यांनी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीत नवीन वादळ निर्माण केले आहे.
अजित पवार आणि सुनील तटकरे हे राज्यातील महत्त्वाचे नेते असून गेल्या काही दिवसांपासून महेंद्र थोरवे त्यांच्यावर टीका करीत आहेत. या टीकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तटकरे यांच्या सत्काराच्या मंचावरून सुनील शेळके यांनी थोरवे यांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली.
महायुतीत संघर्षाची शक्यता?
मावळचे आमदार शेळके हे अजित पवार गटातील महत्वाचे नेते आहेत. त्यांनी थेट “युती तोडण्याची” भाषा केल्याने महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंत युतीतील नेते एकमेकांवर थेट भाष्य करण्याचे टाळत होते, मात्र आता नाराजी उघडपणे व्यक्त होऊ लागल्याने पुढील काळात या वादाचे रुपांतर मोठ्या राजकीय घडामोडीत होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना कर्जतच्या या कार्यक्रमातून शेळके यांनी दिलेला इशारा महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो, असे बोलले जात आहे.
