रायगड । अमुलकुमार जैन
मुंबईचे रहिवासी प्रमोद गणपत देऊळकर यांना पाली पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखद अनुभव आला. बुधवारी (ता. 24) त्यांच्या खरेदीसाठी घेऊन आलेल्या चार लाख रुपये रोख रक्कम आणि बँकेचे तीन महत्त्वाचे चेक असलेली बॅग हरवली होती. मात्र, पाली पोलीस पथकाने अवघ्या अर्ध्या तासात ती बॅग शोधून देऊळकर यांच्याकडे परत केली.
सविस्तर माहिती अशी की, देऊळकर यांनी पाली येथील जांभूळपाडा परिसरात जमीन खरेदीसाठी बॅगमध्ये चार लाख रुपये रोख रक्कम आणि कॅनरा बँकेचे तीन सही केलेले चेक ठेवले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिर परिसरातून जात असताना ही बॅग हरवली.
तत्काळ त्यांनी पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी आणि पोलीस शिपाई गौरव भापकर घटनास्थळी धाव घेत, दुकानदार व परिसरातील लोकांशी चौकशी करून बॅग उचलून नेल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि त्या व्यक्तीचा शोध घेऊन संपर्क साधला. व्यक्तीने प्रामाणिकपणे बॅग पोलीसांकडे सुपूर्द केली.
तपासणी केली असता बॅगेतील चार लाख रुपये रोख रक्कम आणि तिन्ही चेक सुरक्षित असल्याचे आढळले. पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या हस्ते बॅग प्रमोद देऊळकर यांना परत करण्यात आली.
पोलीसांच्या तत्परतेमुळे आणि प्रामाणिक व्यक्तीच्या मदतीमुळे देऊळकर यांनी पोलिसांचे आभार मानले. या जलद कारवाईमुळे पाली पोलीस पथकाचे कौतुक झाले आहे.
