३.८० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त; मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत
रायगड : जिल्ह्यातील गोरेगाव परिसरात बनावट नोटा भारतीय चलनात उतरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी टाकलेल्या छाप्यात तब्बल ३.८० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मुफस्सिर उर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशी (रा. टेमपाले, माणगाव) याच्या घरातून सर्वाधिक बनावट नोटा आढळल्या. त्याच्यासह सुनील बाळाराम मोरे (रा. निगडी-पाबरे, म्हसळा) या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर फरार आरोपी मेहबुब उलडे (रा. बोर्लीपंचतन, श्रीवर्धन) याला सोमवारी दिघी येथून अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
गुन्हे अन्वेषण शाखेला परिसरात बनावट नोटांच्या देवाण-घेवाणीची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना जेरबंद केले. आरोपींच्या घरातील कपाटातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
ही टोळी ५० आणि ५०० रुपयांच्या नोटा हुबेहुब खऱ्यासारख्या तयार करून बाजारात मिसळत होती. यात काही नागरिकांची फसवणूक झाल्याची नोंद असून जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तपासाचे आदेश दिले होते. संशयास्पद नोटांची माहिती पोलिसांना देणाऱ्या सजग नागरिकांमुळे या कारवाईला गती मिळाली.
रविवारी (ता. २१) उशिरा या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपींकडून ३ लाख ८० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, तर बाजारात फिरणाऱ्या बनावट नोटांचा तपास सुरू आहे.
पोलिसांवर या कारवाईदरम्यान राजकीय दबाव आल्याचे चर्चेत आहे. गोरेगाव पोलिस ठाणे व गुन्हे अन्वेषण शाखा पुढील तपास करत असून, नागरिकांनी संशयास्पद नोटा व्यवहार आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन सहा. पो. नि. विजय सुर्वे यांनी केले आहे.
