कोलाड । विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्ग (क्र. ६६) वरील मौजे पुगांव गावाच्या हद्दीत नम्रता गार्डन समोर गुरुवार (दि. २५ सप्टेंबर) सकाळी ८.४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. मोटारसायकलने इको कारला जोरदार धडक दिल्याने हा प्रकार घडला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परवाना नसताना मोटारसायकल (क्र. एमएच-०६ बीजे ११७४) चालवणारा युवक ट्रिपल सीटवरून भरधाव वेगाने गोव्याहून मुंबईकडे जात होता. नम्रता गार्डनसमोर रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने वाहतुकीचे नियम मोडले व समोरून येणाऱ्या इको कारला (क्र. एमएच-०६ जीई ६०१६) जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलस्वार रामनाथ जयराम हिलम (२२, रा. चिवे-जांभूळपाडा), तसेच संजय रामु वाघमारे (१६) व अजय रामु वाघमारे (२१) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात झाली असून, सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. ए. पाटील अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने गोवे, पुई व पुगांवदरम्यान महामार्गावर तातडीने गतिरोधक बसवावेत, अन्यथा आणखी जीवितहानी होऊ शकते, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
