शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांचा इशारा; रिक्षा चालक-मालकांचा रोष
रायगड । अमुलकुमार जैन
राज्यात महायुतीची सत्ता असली तरी ‘देवा भाऊंच्या राज्यात शांतता नसून अशांतता चक्र सुरू आहे,’ अशा शब्दांत शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख व अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी रोष व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सुरू असलेल्या अनधिकृत रेंटल बाईक व्यवसायावर तातडीने कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या काही वर्षांपासून अलिबाग–मुरुड परिसरात पर्यटकांना भाड्याने दुचाकी देण्याचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. परिवहन विभागाची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना बेकायदेशीर पद्धतीने चालणाऱ्या या धंद्यामुळे स्थानिक रिक्षा चालक-मालकांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. पर्यटक थेट रेंटल बाईकचा वापर करत असल्याने तीनचाकी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावली जात आहे.
अलिबाग शहरात शासनाने केवळ दोन परवानाधारकांना दहा–बारा बाईक ठेवण्याची मुभा दिली असतानाही प्रत्यक्षात ४०–५० बाईक रस्त्यावर सोडल्या जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय परवाना नसलेले अनेक जणही भाडेतत्त्वावर दुचाकी देत आहेत. त्यामुळे १,२०० हून अधिक परवानाधारक रिक्षाचालकांचे पोटावर पाय येत असून, हंगामात उपासमारीची वेळ येण्याची भीती संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.
या विरोधात रिक्षा चालक-मालकांनी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे व तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल तसेच अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांना निवेदन दिले. यावेळी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अफजल सय्यद, अमीन मुल्ला, पप्पू पडावे, शरद राऊत, स्वप्नील नाईक, मन्सूर आगा व संदीप म्हात्रे आदी उपस्थित होते.
“गेल्या सहा महिन्यांत अलिबागमध्ये अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे रिक्षा चालक-मालकांना मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा देणार असून, अनधिकृत रेंटल बाईकवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला.
सोमवारी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन बेकायदेशीर धंद्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. पर्यटकांची ने-आण करणारे रिक्षा चालक कर्ज काढून रिक्षा खरेदी करतात; त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अनधिकृत रेंटल बाईकमुळे हा व्यवसाय उद्ध्वस्त होत असून, शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
