“आम्हाला कारवाई करायची हौस नाही, पण वाहन चालक बेजबाबदारपणे वागतात” – वाहतूक पोलीस
रोहा/धाटाव | शशिकांत मोरे
रोहा बाजारपेठेला वाढत्या नागरीकरणासोबतच पार्किंग व वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासले आहे. वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढत असून, वाहतूक पोलिसांकडून रोजच दंडात्मक कारवाई सुरू आहे. तरीदेखील नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे ही समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेप्रमाणे रोहा कायमच गजबजलेली असते. येथे रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि परिसरातील चणेरा, तळा, घोसाळे, भालगाव आदी गावांतील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते. यामुळे शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले असून त्याचबरोबर वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. बसस्थानकासमोर व बाजारपेठेत वाहनचालक बेशिस्तपणे गाड्या उभ्या करतात. शिस्तीचा अभाव ठळकपणे जाणवतो.
या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सातत्याने कारवाई करत असला तरी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता वाहनधारकांनी स्वतः शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असताना नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. नगरपालिका प्रशासनानेही पार्किंगसंदर्भात ठोस धोरण राबवावे, अशी मागणी पुढे येत आहे.
“सध्याची बाजारातील मंदी पाहता पोलिसांना दंडात्मक कारवाई करायची हौस नाही. मात्र नागरिक बेशिस्त आणि बेजबाबदारपणे वागत असल्याने आम्हाला कारवाई करावी लागते,” अशी प्रतिक्रिया रोहा पोलिस ठाण्याच्या महिला वाहतूक पोलीस स्नेहा कासार यांनी दिली.
