मिळकतधारकांनी थकीत कर तातडीने भरावा – नगरपरिषदेचे आवाहन
कर्जत । गणेश पवार
माथेरानमधील मालमत्ता धारकांच्या करावरील शास्ती (दंड) माफ करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या निवेदनानंतर नगरपरिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाल्यामुळे आता मालमत्ता धारकांची शास्ती माफ होणार आहे.
शहरप्रमुख चौधरी यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना लेखी निवेदनाद्वारे थकीत करावरील शास्ती माफ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले होते. २४ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, पालिकेकडून थकीतदारांना तातडीने कर भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शास्ती माफीसाठी अटी-शर्ती
१. शास्ती (दंड) वगळता थकीत कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यासच शास्ती माफ केली जाईल.
२. अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मालमत्ता धारकांनी विहित नमुन्यात अर्ज नगरपरिषदेकडे सादर करावा लागेल. या योजनेअंतर्गत थकीत करावरील शास्ती ५०% पर्यंत माफ होऊ शकते. मात्र अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा असेल.
३. १९ मे २०२५ नंतर झालेल्या थकबाकीवरील शास्तीस अभय योजना लागू राहणार नाही.
४. प्रस्ताव सादर करताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे –
- आधार कार्डाची छायांकित प्रत
- मालमत्ता कर मागणी बिलाची प्रत
- कराची पूर्ण रक्कम भरल्याची पावती
या निर्णयामुळे माथेरानमधील थकबाकीदारांना दिलासा मिळणार असला तरी सर्वांनी तातडीने कर भरून पालिकेच्या अटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
