सहा महिन्यांत सहा गुरे आणि एका कुत्र्याचा बळी; शेतकऱ्यांची वनविभागाकडे कारवाईची मागणी
म्हसळा । वैभव कळस
म्हसळा तालुक्यातील मोरवणे, वांगणी, देहन व पाष्टी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. फक्त सहा महिन्यांत या भागातल्या सहा गाई-वासरांसह एका पाळीव कुत्र्याला बिबट्याने ठार मारल्याची माहिती पुढे आली आहे.
घनदाट वनराईने व्यापलेला हा परिसर नेहमीच जंगली स्वापद व विविध पशुपक्ष्यांच्या वास्तव्यामुळे ओळखला जातो. रोहा परिक्षेत्राअंतर्गत म्हसळा वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जंगल पसरलेले असून, देहन येथील कृषी विभागाची नर्सरी आणि बारमाही पाण्याचे स्रोत असल्याने या भागात बिबट्याला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे बिबट्याचा वावर वाढला असून, तो अधूनमधून गावात शिरून पाळीव जनावरांवर हल्ले करीत आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत मोरवणे गावातील दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यातील तीन वासरे, वांगणीतील शेतघरातील पाळीव कुत्रा, अशोक नाईक यांचा बैल, राजा गायकर यांची गाय तसेच नुकतेच २६ सप्टेंबर रोजी विश्वास नाईक यांच्या गोठ्यातील सहा महिन्याचे वासरू बिबट्याने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत.
या घटनांची नोंद म्हसळा वनविभाग कार्यालयात करण्यात आली असून, आतापर्यंत चार शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यात आली असल्याची माहिती अशोक नाईक यांनी दिली. मात्र, बिबट्याचे वारंवार होणारे हल्ले आणि वाढते नुकसान पाहता शेतकरी व गावकरी चांगलेच चिंतेत आहेत.
मोरवणे–वांगणी परिसरातून दिवसरात्र लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे भविष्यात बिबट्याने एखाद्या माणसावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच रोहा परिक्षेत्रातील म्हसळा वनविभागाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
