नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
रोहा/धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा नवरात्र उत्सव यंदाही भक्तिमय वातावरणात सुरू आहे. भोळ्या भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या नवरात्रात गावागावांतून भाविक मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेत आहेत.
सालाबादप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी गावातून पालखी काढून महादेवी मंदिरात नेली जाते. यानंतर उत्सवाची सुरुवात होते. या वेळी देवीचा गजर घुमत असतो. भातसई गावचे भगत चितामणी खरीवले यांच्या अंगावर देवीचा वारा येतो, अशी श्रद्धा आहे.
भातसईसह झोळांबे, लक्ष्मीनगर, कोपरे आदी गावांतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आईची घटस्थापना झाल्यानंतर चारही गावांमध्ये घरच्या देवतेची घटस्थापना केली जाते. नवसकरी भक्त नऊ दिवस उपवास धरून मंदिरातच वास्तव्यास राहतात व दररोज सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळा देवीची आरती केली जाते.
नवरात्र काळात रोज काकड आरती, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, भजन, नाच-गाणी असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम होतात. रायगड जिल्ह्यासह मुंबई व पुण्यातूनही भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात.
या उत्सवात खरिवले, कोतवाल, थोरवे, उशिरकर, जोशी, पोळेकर, म्हात्रे, गवळी, जाबेकर, रटाटे, कनोजे, सकपाळ, पाटील या गावातील कुटुंबांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
