अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्रकल्पाचा तीन वर्षांत बोजवारा
वारंवार पाईप फुटी, हजारो लिटर पाणी वाया; ठेकेदाराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने तब्बल २२.३७ कोटी रुपये खर्चून उभारलेला जलशुद्धीकरण प्रकल्प अवघ्या तीन वर्षांत निकामी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
हा प्रकल्प ३ डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला होता. मात्र आज केवळ दीड-दोन वर्षांचा कालावधी उलटताच प्रकल्पाची दुरवस्था सुरू झाली आहे.
गाजावाजा मोठा, परिणाम शून्य
या प्रकल्पातून दरडोई १३५ लिटर स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. आराठी, धोंडगल्ली, जीवन इत्यादी परिसरांमध्ये लाखो लिटर क्षमतेच्या टाक्या उभारण्यात आल्या. गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा यंत्रणा तसेच ८५ केव्ही क्षमतेची सौर प्रणाली बसविण्यात आल्याचा मोठा गवगवा अधिकाऱ्यांनी केला होता.
मात्र वास्तवात परिस्थिती भलतीच निघाली. वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत असून अलीकडेच पतंगे पेट्रोल पंप परिसरात हजारो लिटर पाणी वाया गेले.
ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह
पाईप फुटल्याने प्रचंड पाणी वाया जात असल्याने प्रकल्पातील वापरलेल्या साहित्याचा दर्जा व ठेकेदाराच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एवढ्या प्रचंड खर्चानंतर एवढ्या अल्पावधीत प्रकल्प निकामी होणे, हा जनतेच्या पैशाचा सरळसरळ अपव्यय असल्याची चर्चा जोर धरत आहे.
नागरिकांचा आक्रोश
“नगरपरिषद हद्दीत जनतेच्या पैशावर अक्षरशः पाणीच फेरले जात आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दुष्काळी परिस्थितीची टांगती तलवार डोक्यावर असताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.
