क्लिनिक व पॅथॉलॉजी लॅबचा निष्काळजीपणा उघड; तातडीने चौकशी व कारवाईची मागणी
उरण । अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील शहरी भागात क्लिनिक व पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा वैद्यकीय बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, संबंधितांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आरोग्यासाठी गंभीर धोका
वैद्यकीय बायोमेडिकल कचरा ही आजघडीला गंभीर समस्या आहे. क्लिनिक आणि पॅथॉलॉजी लॅबमधून बाहेर पडणारा हा कचरा थेट मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. अशा कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी शासनाने अधिकृत संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्था ठराविक शुल्क घेऊन हा कचरा गोळा करतात आणि शासनाच्या नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावतात.
मात्र, हे शुल्क वाचविण्यासाठी काही दवाखाने व पॅथॉलॉजी लॅब धारक हा कचरा वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर टाकत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे.
उरण शहरातील चारफाटा परिसरातील मच्छीमार्केटजवळ असा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य नागरिकांना पाहायला मिळाले. रक्ताने माखलेल्या कापसाच्या गाद्या, सिरिंज, सलाईनच्या बाटल्या असे साहित्य या कचऱ्यात आढळून आले. त्यामुळे रोगराईला आमंत्रण देणारा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा हा प्रकार मानला जात आहे.
संबंधित क्लिनिक व पॅथॉलॉजी लॅब धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या दुर्लक्षावरही नाराजी व्यक्त होत आहे.
दवाखाने किंवा पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा वैद्यकीय जैविक कचरा उघड्यावर टाकता येत नाही. तसे केल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. सदरचा कचरा हा पॅथॉलॉजी लॅबमधून निघालेला कचरा असून हा कचरा उघड्यावर टाकणे घातक आहे. यापासुन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
-डॉ. राजेंद्र इटकरे,
तालुका आरोग्य अधिकारी
