७ कोटींचा खर्च, ग्रामस्थांनी दिली ३ एकर जागा मोफत
रोहा/धाटाव | शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील विरजोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट होऊन नागरिकांना सुलभ, दर्जेदार व वेगवान सेवा मिळणार असल्याचा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
सुमारे ७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या भव्य व सुसज्ज आरोग्य केंद्राचे लोकार्पण खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रासाठी ग्रामस्थांनी ३ एकर जागा मोफत उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामस्थांच्या या योगदानाचेही उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, जेष्ठ नेते जगन्नाथ कुंडे, सरपंच प्रदीप कुंडे, जेष्ठ कार्यकर्ते संजय नाकती, युवा कार्यकर्ते रवींद्र घोसाळकर, मोरेश्वर नाकती, विभागीय अध्यक्ष उदय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. सुनील तटकरे म्हणाले, “या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गरीब व वंचित लोकांसाठी त्यांच्या दारीच दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचणार आहे. यामुळे ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. विकासात्मक कामांमुळे या भागाचा कायापालट होणार आहे.”
विरजोलीसह आसपासच्या शेकडो गावे, वाड्या व वस्त्यांतील नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने पूर्वी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शासनाने या भागात आरोग्य केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असता ग्रामस्थांनी एकजूट दाखवून ३ एकर जागा विनामोबदला दिली. आज या जागेत उभारलेले अत्याधुनिक केंद्र पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
