मुरुड | वार्ताहर
रेवदंडा-मुरुड मार्गावर विहूर गावाजवळ आज (शनिवार, दि. २७) दुपारी दीडच्या सुमारास एसटी बस व पिकअप टेम्पो यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन १३ प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथून मुरुडकडे येणारी एसटी बस आणि अलिबागच्या दिशेने जाणारा पिकअप टेम्पो यांची विहूर येथील वाकड्या आंब्याजवळील अवघड वळणावर समोरासमोर धडक झाली. टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. धडकेत एसटी व पिकअपचे मोठे नुकसान झाले असून टेम्पोतील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. टेम्पो चालक गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
सदर पिकअप टेम्पोमधील प्रवासी हे मजगाव व नांदगाव परिसरातील असून, ते मुरुड येथील कोटेश्वरी देवीचे नवरात्र दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना तत्काळ मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुरुड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा केला व जखमींना उपचार मिळवून दिले. त्यामुळे सर्वांना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाली.
जखमी १३ प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी काहींना किरकोळ दुखापती तर काहींना गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
