मंजूर २८ निवारा शेडपैकी फक्त ६ ठिकाणीच प्रत्यक्ष काम सुरू; दरडीचा धोका वाढला तरी प्रशासन सुस्त
महाड । मिलिंद माने
महाड तालुक्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. २००५ मध्ये महाडसह पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे भीषण भूस्खलनाची साक्षीदार ठरली. शेकडो लोकांचे जीव गेले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यानंतर तळीये गावात २०२१ मध्ये झालेल्या दरड दुर्घटनेने पुन्हा भीषण आठवणी जाग्या झाल्या. तरीदेखील दरडग्रस्त भागांमध्ये सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत.
राज्य शासनाने महाड तालुक्यातील ७२ दरडग्रस्त गावांसाठी तात्पुरते निवारा शेड बांधण्याचा निर्णय घेतला होता. महसूल विभागाच्या कागदपत्रांनुसार, एकूण २८ ठिकाणी शेड मंजूर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात फक्त ६ ठिकाणीच कामे सुरू असल्याचे उघड झाले आहे. उर्वरित ठिकाणी कामे प्रलंबित असून, भूस्खलनाचा धोका कायम असताना प्रशासनाची ही सुस्त भूमिका चिंताजनक ठरत आहे.
डोंगराळ भूभागातील कायमस्वरूपी संकट
महाड तालुक्याचा सुमारे ८० टक्के भाग डोंगराळ आहे. पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनीला भेगा पडतात आणि दरडी कोसळतात. प्रत्येक वर्षी महसूल विभागाकडून संभाव्य धोकादायक गावांना स्थलांतराच्या नोटिसा दिल्या जातात. नागरिकांना तात्पुरत्या शाळा, मंदिर, समाजमंदिर किंवा अंगणवाडीत हलविण्याची व्यवस्था केली जाते. परंतु पावसाळ्यानंतर पुन्हा नागरिक मूळ गावात परततात, आणि दरडग्रस्तांची भीषण समस्या कायम राहते.
शेड मंजूर… पण प्रगती थंडावलेली
महाड तालुक्यातील दरडग्रस्त गावांसाठी शासनाने ज्या २८ निवारा शेडला मंजुरी दिली आहे त्यापैकी अनेक ठिकाणी कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. काही शासकीय जागेवर, तर काही खाजगी जागेवर शेड उभारण्यात येणार आहेत. परंतु जागेची मोजणी, ताबा, निधी वापर यांसारख्या कारणांमुळे प्रक्रिया रेंगाळली आहे.
सध्या प्रत्यक्षात फक्त सव, दासगाव भोईवाडा, काळभैरव नगर (नडगाव), कोठेरी तांदळेकर वाडी, करंजाडी म्हस्के कोंड, नातोंडी धारेची वाडी, शेलटोळी आणि चाडवे खुर्द येथेच शेड बांधकाम प्रगतीत आहे.
दरडग्रस्त गावांचे वास्तव
महाड तालुक्यातील लोअर तुडील, नामावली कोंड, शिंगरकोंड मोरेवाडी, आंबिवली, सव, सोनघर, जुई बुद्रुक, चाडवे खुर्द, रोहन, कोठेरी जंगमवाडी यांसारख्या गावांना दरडग्रस्त म्हणून यादीत प्राधान्य देण्यात आले आहे. या ७२ गावांतील हजारो नागरिकांना निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण कागदोपत्री आहे. मात्र प्रत्यक्षात आजतागायत केवळ काहीशा भागातच प्राथमिक पावले उचलली गेली आहेत.
आपत्कालीन यंत्रणा अपुरी
दरडीची भीषणता लक्षात घेता पूर्वसूचना देणारी यंत्रणा (early warning system) विकसित करणे अत्यावश्यक आहे. मात्र महाड तालुक्यात अशी कोणतीही शास्त्रशुद्ध प्रणाली उपलब्ध नाही. परिणामी मुसळधार पावसाळ्यात अचानक दरड कोसळल्यास जीवितहानी अटळ ठरते.
लोकप्रतिनिधी व प्रशासनावर प्रश्नचिन्ह
२००५ आणि २०२१ च्या दुर्घटनांनंतर राज्य सरकारने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजही प्रत्यक्ष अंमलबजावणीत उणीवच जाणवते. शासनाकडून निधी मंजूर असूनही शेडची कामे प्रलंबित राहतात याला स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेसह अधिकाऱ्यांचा उदासीनपणा कारणीभूत असल्याची चर्चा जनतेत आहे.
प्रश्न अद्याप अनुत्तरीत
दरडीचा धोका कायम असून, प्रत्येक वर्षी पावसाळ्याआधी नागरिकांना स्थलांतराची वेळ येते. तरीही सुरक्षित निवारा शेडची कामे अद्याप अपुरी आहेत. कोकणातील जीवितहानी टाळण्यासाठी शासनाने वेगाने कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एखादी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाली सुरू होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महाड तालुक्यातील दरडग्रस्त गावांची वास्तव स्थिती
🔹 एकूण स्थिती
- महाड तालुक्यातील ७२ गावे दरडग्रस्त यादीत
- पावसाळ्यात नागरिकांना स्थलांतराची वेळ
🔹 शासनाची योजना
- एकूण मंजूर निवारा शेड : २८
- प्रत्यक्ष सुरू कामे : ६
- कामे थांबलेली/प्रलंबित : २२
🔹 प्राधान्याने पुनर्वसनासाठी निवडलेली गावे (शासकीय जागा)
१) चाडवे खुर्द
२) गोठे बुद्रुक
३) दासगाव भोईवाडा
४) काळभैरवनगर, नडगाव
५) शेलटोळी
६) परडी वाडी, गोठण
७) वाघेरी आदिवासी वाडी
८) कोठेरी तांदळेकर वाडी
९) करंजाडी म्हस्के कोंड
१०) नातोंडी धारेची वाडी
११) बारसगाव
🔹 प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेली ठिकाणे
१) सव
२) दासगाव भोईवाडा
३) काळभैरव नगर (नडगाव)
४) कोठेरी तांदळेकर वाडी
५) करंजाडी म्हस्के कोंड
६) नातोंडी धारेची वाडी
७) शेलटोळी
८) चाडवे खुर्द
🔹 भूस्खलन दुर्घटनांचा इतिहास
- २००५ : महाड–पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून शेकडो जीव गेले
- २०२१ : तळीये गावात दरड कोसळून मोठी जीवितहानी
