करूर (तामिळनाडू) │ तामिळ सुपरस्टार थलापति विजय यांच्या शनिवारी रात्री झालेल्या करूरमधील रॅलीत चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली. या घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३ पुरुष, १७ महिला, ४ मुलं आणि ५ मुलींचा समावेश आहे. तब्बल ५१ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. जखमींची प्रकृती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध नेत्यांनी शोक संदेश दिला. तामिळनाडू सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.
स्टॅलिन म्हणाले, “करूरमधील ही दुर्घटना शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकी हृदयद्रावक आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. राज्यातल्या राजकीय प्रचारात अशी दुर्घटना याआधी कधीच घडली नव्हती.”
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय यांच्या सभेला साधारण १० हजार लोक येतील असा अंदाज होता. मात्र ३० हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र आल्याने परिस्थिती बिघडली. विजय यांचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता होणार होता, परंतु ते सायंकाळी ७ वाजता पोहोचल्याने गर्दी अधिकच वाढली. ५०० हून अधिक पोलिस तैनात होते, तरी अपेक्षेपेक्षा प्रचंड गर्दीमुळे गोंधळ झाला. पाणी व जेवणाची अपुरी सोयही लोकांच्या अडचणीत भर ठरली.
दुर्घटनेनंतर करूरमध्ये अतिरिक्त २ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.
