वाहनधारक त्रस्त; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाकडे तक्रारींचा पाढा
रोहा/धाटाव । शशिकांत मोरे
रोहा–कोलाड मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा उच्छाद सुरू असून, रोजच नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ४० ते ५० गुरांचा वावर कायम असून, ही जनावरे अक्षरशः रस्त्यातच बस्तान मांडून बसतात. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय आणि अपघातांची शक्यता वाढली आहे.
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मुंबई–पुण्यासारख्या शहरांतून मुरूड, अलिबागसारख्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांचा हा मुख्य मार्ग आहे. तसेच धाटाव औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने, एसटी, शालेय बसेस, रिक्षा, टेम्पो, दुचाकी–चारचाकींची सततची ये–जा सुरू असते. सध्या नवरात्रोत्सवामुळे वाहतूक अधिक वाढली असून, मोकाट जनावरे धोक्याचे कारण ठरत आहेत.
यापूर्वीही अशाच समस्येमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. अचानक समोर येणाऱ्या गुरांमुळे भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटते आणि अपघात घडतात. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांचा संताप उफाळून आला आहे.
नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही योग्य तो बंदोबस्त करण्यात आलेला नाही. “मोकाट गुरांमुळे अपघात, कोंडी आणि जीवितास धोका निर्माण होतोय, तरीही प्रशासन कानाडोळा करतंय,” अशी नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, काही ठिकाणी ही जनावरे चोरट्यांच्या टेहळणीसाठीही वापरली जात असल्याची भीती नागरिकांतून व्यक्त होते. मात्र, मालकांची निष्काळजी व प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना आता वेसण घाला रे..ऽऽऽ असे म्हणण्याची वेळ येथील सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.

आम्ही रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीत कारखान्यात तीनही शिफ्टमध्ये काम आम्ही रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीत कारखान्यात तीनही शिफ्टमध्ये काम करीत असतो. रोहा-कोलाड रस्त्यावर सतत मोकाट गुरांनी ठिय्या मांडलेला असताना रस्ता मोकळा नसल्याने वाट काढून जावे लागते. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांमुळे कामगार वर्ग, शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत असल्याची समस्या गंभीर आहे.
-रामेश्वर वडले,
सुरक्षा कर्मचारी

रोहा कोलाड रस्त्यावर मध्येच गुरे बसलेली दिसतात. रस्त्यामध्ये गुरे बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघात वाढत आहेत. या गुरांच्या मालकांनी घरी शांत झोपून गुरांना रस्त्यावर मोकाट सोडून देणे चुकीचे आहे. सर्वत्र गुरे चोरांची भीती असूनही मुक्या प्राण्यांना रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्या मालकांवर संबंधित प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.
-सौ. सुप्रिया पाशिलकर,
महिला तालुकाध्यक्ष, आखिल भारतीय मराठा महासंघ, रोहा
