आपत्कालीन व्यवस्थापन कोमात; शेतकऱ्यांमध्ये नैराश्य
उरण । अनंत नारंगीकर
दोन दिवस उसंत घेतल्यानंतर शनिवारी (दि. २७) रात्रीपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील बहुतांश भातशेती आडवी पडली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. परिणामी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र शेतकरी आणि रहिवाशांना मदतीचा हात देणारे आपत्कालीन व्यवस्थापन रविवारी कोठेच दिसून न आल्याने नागरिकांमध्ये संताप आणि नैराश्य व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान खात्याने २७ ते ३० सप्टेंबर या काळात कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मराठवाडा, बीड, सोलापूरमध्ये परतीच्या पावसाने आधीच हाहाकार माजवला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोकणातही सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात उरण तालुक्यात शनिवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
घरांची पडझड, शेती आडवी पडणे यामुळे शेतकरी अडचणीत आले असतानाच जिल्हा प्रशासन वा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग यांचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. चिरनेर परिसरातील रहिवाशांची घरे उद्ध्वस्त झाली, अनेकांचे संसार उघड्यावर आले, तरी कोणीही पाहणीसाठी फिरकले नाही.
शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की, “शासकीय आपत्कालीन यंत्रणा कोमात गेली नाही ना?”. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियतेमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
उरण तालुक्यात शनिवारी आलेल्या वाऱ्याच्या पावसामुळे कापणी साठी आलेली भात शेती आडवी पडली आहे.तसेच काही रहिवाशांच्या घरांची पडझड झाली असताना शासकीय आपत्कालीन व्यवस्थापन मदतीसाठी पुढे येत नसतील तर ही शोकांतिका आहे.तरी शासनाने आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच उरण तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
-संतोष ठाकूर,
शेतकरी
