महाडच्या अष्टपैलू खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी
रायगड । क्रीडा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. महाड तालुक्यातील सुकन्या कुमारी रोशनी रविंद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू खेळाडू असणारी रोशनी पारधी ही रायगडच्या क्रिकेट इतिहासातील पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे, जिने वरिष्ठ संघात स्थान पटकावले आहे.
अवघ्या सोळा वर्षांच्या वयात रोशनीने मिळवलेले हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे. यापूर्वी ती महाराष्ट्राच्या 15, 17 आणि 19 वर्षाखालील कनिष्ठ गटांच्या संघात खेळली असून सतत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले आहे.
लागोपाठ तीन शतकांनी कमावले लक्ष
गतवर्षी झालेल्या आंतरजिल्हा 15 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत रोशनीने सलग तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ती जलदगती गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज अशी दुहेरी भूमिका पार पाडते. सातत्याने उल्लेखनीय फलंदाजी व गोलंदाजी करत तिने रायगड जिल्हा संघाला विजय मिळवून दिला आहे.
मेहनतीचे चीज
रोशनी हिचे वडील रवींद्र पारधी, एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाडचे अध्यक्ष बशीर चिचकर आणि प्रशिक्षक आवेश चिचकर यांनी तिच्या निवडीबद्दल अपार आनंद व्यक्त केला. “कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण खेळामुळे रोशनीने हे यश मिळवले आहे. तिच्या मेहनतीचे चीज झाले,” असे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि सचिव प्रदीप नाईक यांनी रोशनी, तिचे पालक तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. “रोशनीने कमी वयात गाठलेले यश रायगडसाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेटमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आरडीसीए कटिबद्ध आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
भविष्यात रोशनीने भारताच्या संघात स्थान मिळवावे, ही सर्वांची अपेक्षा आहे. त्यासाठी लागेल ती मदत करण्याची तयारी असल्याचेही आरडीसीएच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
रोशनी पारधी हिच्या या यशाबद्दल आरडीसीएचे पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगडच्या या कन्येने खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे नाव ‘रोशन’ केले असून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
