नवतरुण मित्र मंडळाचा पानखिंडीचा थरार ठरला मुख्य आकर्षण
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
नवरात्र उत्सव म्हटलं की देवीपूजा, आरत्या, भक्ति-भाव आणि आकर्षक देखावे ही ओळख श्रीवर्धनची आहे. यावर्षी शहरात उभारण्यात आलेल्या विविध देखाव्यांपैकी नवतरुण मित्र मंडळ, भैरवनाथ पाखाडी यांनी साकारलेला ऐतिहासिक देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
या मंडळाने ”पानखिंडीचा थरार” म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे आणि शूर मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेलं अद्वितीय बलिदान अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने उभा केला आहे. देखाव्यातील सजीव दृश्यांमुळे प्रेक्षक क्षणभर पानखिंडीच्या रणभूमीत पोहोचल्याचा अनुभव घेत आहेत.

मावळ्यांच्या रणगर्जना, ढोल-ताशांचा नाद, बाजीप्रभूंचं पराक्रमी व्यक्तिमत्त्व आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी दिलेली त्यांची शेवटपर्यंतची लढाई हे सर्व या देखाव्यात इतक्या प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे की प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर काटा उभा राहतो.
भक्तीबरोबर इतिहासाचं स्मरण
नवरात्र उत्सवाचा धार्मिक व सांस्कृतिक आविष्कार असतानाच, या देखाव्यातून इतिहासाची प्रेरणा जिवंत करण्याचं काम मंडळाने केलं आहे. भक्तिभावाबरोबरच स्वराज्याच्या शौर्याचा गौरव या निमित्ताने नागरिकांना अनुभवता आला.
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
श्रीवर्धनमधील नागरिक, तसेच बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांकडून या देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी देखाव्याचं कौतुक करताना, “हे केवळ डोळ्यांना आनंद देणारं नव्हे, तर मनात अभिमान, प्रेरणा आणि देशभक्ती चेतवणारं दर्शन आहे,” अशी भावना व्यक्त केली.
नवरात्रीत भक्ती, कला आणि इतिहासाचा संगम
यंदाच्या नवरात्र उत्सवाला श्रीवर्धनमध्ये “भक्ती, कला आणि इतिहासाचा संगम” अशी वेगळी ओळख मिळाली आहे. नवतरुण मित्र मंडळाने केलेल्या या सादरीकरणामुळे परंपरेला नव्या अंगाने उजाळा मिळाला असून, स्थानिकांसह पर्यटकांमध्येही उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
