आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्रेरणादायी व्याख्यानमालेचा शुभारंभ
अलिबाग (प्रतिनिधी) : “माणूस म्हणून जन्माला आला आहात तर मानवतेचा धर्म पाळा. कुणाला तरी उपयोगी पडेल असे चांगले काम करा. पैसे नसले तरीही निस्वार्थीपणे केलेले चांगले काम कधी वाया जात नाही. समाज त्या कामाची नोंद घेतो आणि विश्वास निर्माण झाला की मदतीचे हात आपोआप पुढे येतात,” असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशन, जळगावचे संस्थापक यजुर्वेद महाजन यांनी केले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्रेरणादायी व्याख्यानमालेचा शुभारंभ शनिवारी (दि. 27) अलिबाग येथील आदर्श भवनात झाला. या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान यजुर्वेद महाजन यांनी “जीना इसी का नाम है” या विषयावर दिले.
चांगल्या माणसांनी एकत्र यायला हवे
“समाजात चांगल्या कामासाठी चांगल्या माणसांनी एकत्र आले पाहिजे. चांगली माणसे स्वस्थ बसली तर वाईट प्रवृत्तींची शक्ती वाढते आणि समाजाचे नुकसान होते. प्रत्येकाने आपले ध्येय ठरवून त्याला जीवनाचा भाग बनवले पाहिजे. रचनात्मक काम करताना नियोजन आवश्यक आहे. चांगल्या कामाचे फळ निश्चित मिळतेच,” असे महाजन यांनी सांगितले.
आपल्या व्याख्यानात त्यांनी दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर मुलांसाठी दीपस्तंभ फाऊंडेशन करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रायगडमधील ज्या दिव्यांग व अनाथ मुलांना शैक्षणिक मदत आवश्यक आहे, त्यांना मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
आदर्श पतसंस्थेचे कौतुक
“पतसंस्था चालवणे सोपे काम नाही. मात्र, आदर्श नागरी पतसंस्था आपल्या नावाला साजेसे काम करत असल्यामुळेच ग्राहकांचा विश्वास जपण्यात यशस्वी ठरली आहे,” अशा शब्दांत महाजन यांनी संस्थेचे कौतुक केले.
दीपस्तंभ फाऊंडेशनला आर्थिक मदत
या प्रसंगी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दीपस्तंभ फाऊंडेशनला एक लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी यजुर्वेद महाजन यांना सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष अभिजित पाटील, संचालक सतीश प्रधान, महेश चव्हाण, संजय राऊत, ॲड. वर्षा शेठ, रेश्मा पाटील, श्रीकांत ओसवाल, विलाप सरतांडेल, डॉ. मकरंद आठवले, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले.
