“रोहा नगरपालिकेची दोन वर्षं सूत्रं द्या, मग खरा विकास दाखवतो” –आ. महेंद्र दळवी
रोहा (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महायुतीत खटके उडताना दिसत आहेत. विशेषतः पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील शाब्दिक चकमक आता चांगलीच चिघळली आहे. रोहा येथे झालेल्या सभेत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांना आव्हान दिले.
“श्रेय घेण्याची सवय तटकरेंना”
“आम्ही केलेल्या योजनांचे श्रेय तटकरे घेतात. प्रत्येक गोष्ट ‘मी केलं’ असं सांगणं ही त्यांची सवय झाली आहे,” असा आरोप दळवी यांनी केला. त्याचबरोबर रोहेकरांना उद्देशून, “रोहा नगरपालिकेची दोन वर्षं सूत्र आमच्या हातात द्या, मग खरा विकास दाखवून देतो,” असे आवाहनही त्यांनी केले.
“जादूची कांडी माझ्याकडे आहे”
दळवी यांनी भाषणादरम्यान तटकऱ्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. “पत्रकारांसमोर सगळं बोलणं शक्य नाही, पण जेव्हा स्फोट होईल तेव्हा तटकरे साहेबांना वर बघावं लागेल. त्यांच्यापेक्षा वरची जादूची कांडी माझ्याकडे आहे,” असे वक्तव्य करताच एकच खळबळ उडाली. यावेळी दळवींची जीभ घसरली आणि “या नालायकांसोबत जाणार नाही,” असा शब्दप्रयोग त्यांनी केला.
राष्ट्रवादीसोबत युती नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना दळवी यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. “राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही. भाजप आली तर ठीक, अन्यथा आम्ही ‘एकला चलो रे’च्या बाणावरही निवडणुका लढवण्यास सक्षम आहोत,” असा ठाम दावा त्यांनी केला.
पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष
महेंद्र दळवी यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता खासदार सुनील तटकरे कोणता पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. ते दळवी यांची मनधरणी करणार की स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मतानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात स्वतंत्र लढाई लढवण्याचा निर्णय घेणार? यावर आगामी निवडणुकांचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
