“सीसीटीव्ही ही काळाची गरज, सर्व गावांनी पुढाकार घ्यावा” – पो. नि. किशोर साळे
चोंढी-अलिबाग । अब्दुल सोगावकर
गाव आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे प्रभावी ठरत आहेत. या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने अनेक गुन्हे उघडकीस येऊन पोलिसांना तपासात मदत झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गावाने मुशेतसारखा पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी केले.
मुशेत येथील जाधव पाडा येथे मुनवली गावचे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या सामाजिक बांधिलकीतून गावाला देण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन साळे यांच्या हस्ते करण्यात आले.
गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचे साधन
यावेळी बोलताना पो.नि. साळे म्हणाले, “सीसीटीव्ही बसवल्यामुळे गाव व परिसर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्यास मोठी मदत मिळते. महिलांची व मुलांची सुरक्षा, चोरीसारखे गुन्हे तसेच विविध प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही ही आजच्या काळाची खरी गरज आहे.”
त्यांनी पुढे सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरावरही इशारा दिला. “आजकाल सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना फसवले जाते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांनी मोबाईल व सोशल मीडियावर काय पाहते याची दक्षता घ्यावी. जागरूकतेनेच कोणत्याही आपत्तीपासून वाचता येते,” असे साळे यांनी सांगितले.
योगदानाबद्दल कौतुक
कार्यक्रमाच्या प्रारंभी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे आणि सातिर्जे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर यांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या योगदानाचे कौतुक केले.
या सोहळ्यास पो. नि. किशोर साळे यांच्यासह काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल थळे, प्रा. केशव चांदोरकर, माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर, प्राची ठाकूर, माजी उपसरपंच समद कुर, काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, माजी सदस्य अनिल जाधव, संजय शिंदे, अण्णा सातमकर, राजेंद्र घरत, माजी सदस्या सानिका घाडी, प्राजक्ता जाधव, पोलीस पाटील प्रफुल्ल थळे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील व मुशेत गावातील ग्रामस्थ – महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे सर यांनी केले.
