यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही -अशोक सराफ
‘बहुरूपी अशोक’च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध
उरण | विठ्ठल ममताबादे
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, अभिनयाचे बादशहा पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार उलवे येथे झाला. ‘यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था’च्या वतीने आयोजित या सोहळ्याला रसिकांची तुफान गर्दी उसळली होती.

रविवारी उलव्यातील भूमिपुत्र भवन खचाखच भरून गेले होते. हजारो चाहत्यांनी अशोक सराफ यांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या अभिनय प्रवासावर आधारित नरेंद्र बेडेकर निर्मित ‘बहुरूपी अशोक’ या विशेष कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

अशोक सराफ यांची भावना
“माझ्या आयुष्यात रसिक प्रेक्षक हेच माझे खरे मायबाप आहेत. त्यांच्या प्रेमामुळेच माझा अभिनय प्रवास आजवर सुरू आहे. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्य उजळून गेले. सर्वांनाच अशा जोडीदार मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले. महाराष्ट्रातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले. यापूर्वी अनेक सत्कार झाले, पण उलव्यातील हा नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आणखी वाढला आहे,” असे अशोक सराफ यांनी कृतज्ञतेने सांगितले.
मान्यवरांची भाष्ये
खासदार सुनील तटकरे : “अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा जन्माला येणे नाही. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायलाच हवा. आम्हालाही राजकारणात विविध भूमिका कराव्या लागतात. अशा सर्व कलाकारांना एकत्र आणण्याचे काम महेंद्र घरत यांनी करून दाखवले.”

माजी खासदार रामशेठ ठाकूर : “आम्ही आजही त्यांच्या चित्रपट व मालिकांचा आनंद घेतो. महेंद्रशेठ माझा शिष्य नाही, तर भाऊच आहे.”

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे : “अशोक सराफ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसविले. त्यांच्या कलेमुळे ते लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. रायगडसाठी दि. बा. पाटील यांचे योगदान मोठे आहे. महेंद्र घरत यांच्याकडे प्रचंड गुणवत्ता असून त्यांना राजकारणात योग्य स्थान मिळायला हवे.”

वनमंत्री गणेश नाईक : “अशोक सराफ हे आजही रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहेत. त्यांच्या यशामध्ये निवेदिता सराफ यांचेही मोठे योगदान आहे. महेंद्र घरत यांनी मनात ठरवले तर ते काहीही करून दाखवू शकतात. विविध पक्षातील नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्याची ताकद त्यांच्यात आहे.”

महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी भावनिक भाषण करत “भूमिपुत्र भवनाच्या निर्मितीत माझा सिंहाचा वाटा आहे. उरणचे हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी आरक्षित झालेला भूखंड खारफुटीत अडकला आहे. हे स्मारक उभारण्यासाठी मान्यवरांनी पुढाकार घ्यावा,” अशी मागणी केली.

या सोहळ्याला शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, शिवसेनेचे बबनदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, मिलिंद पाडगावकर, विनोद म्हात्रे, गोपाल पाटील, राम हरी म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि सचिव शुभांगीताई घरत यांनी रायगड व नवी मुंबईतील नागरिकांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले.
“कलेवर मी मनापासून प्रेम करतो. नाटक, चित्रपट, क्रिकेट यांची मला आवड आहे. कला जिवंत राहावी म्हणून अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला उलवे नगरीत आणले. रसिकांच्या तुडुंब गर्दीत त्यांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा आनंद सर्वांना मिळाला, हे माझ्यासाठीही अभिमानास्पद आहे.”
— महेंद्रशेठ घरत, आंतरराष्ट्रीय कामगार नेते
