अलिबाग । अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील वडखळ-अलिबाग राज्य महामार्गावरील पोयनाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कणपूर येथील रहिवासी पंकज ऊर्फ वरुण यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोयनाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन पीडितेला आरोपीने तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत, दिनांक ११ सप्टेंबर २०२५ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान आपल्या रुममध्ये जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेच्या इच्छेविरुद्ध घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या प्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ६४(२)(आय)(म), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४, ५(एल), ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक मरस्कोले करत आहेत. आरोपी पंकज यादव याला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो उत्तर प्रदेशात फरार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
