माणगाव विस्तारित कार्यकारणी बैठकीत खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
माणगाव । सलीम शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची विविध पदांच्या नियुक्तांचे दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अखेर सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता माणगाव येथील कुणबी भवन येथे झालेल्या खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण बैठकीत ॲड. राजीव साबळे यांची कोकण विभाग संघटक तसेच मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य या पदांवर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे कोकण विभागातील पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दक्षिण रायगड कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव, माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, उणेगाव ग्रामपंचायत माजी सरपंच राजू शिर्के, माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत श्रीमती शर्मिला सुर्वे, नगराध्यक्ष माणगाव यांची महिला उपाध्यक्ष, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदी, सुनिल पवार यांची माणगाव शहराध्यक्ष पदी तर ॲड. सुशिलकुमार दसवते यांची माणगाव तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. बैठकी दरम्यान खा. तटकरे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, आगामी जि. प. व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारी साठी आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचे आवाहन केले. “पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेच्या हिताचे काम करा, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय व्हा” असे मार्गदर्शन त्यांनी केले. या बैठकीत स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि निवडणूक तयारी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रकाश जाधव यांनी सहपत्निक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकारी व नवीन कार्यकर्त्यांच्या आगमनामुळे पक्षाच्या कामकाजात नवी ऊर्जा संचारेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माणगाव तालुक्यातील या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीमुळे पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसह भावी राजकीय वाटचालीला नवा वेग मिळणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी कामकाज होईल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
