१०८ कुटुंबीयांना नोव्हेंबरपर्यंत दिलासा; सिडकोची कागदपत्रं दाखल
उरण । घनःश्याम कडू
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी गृहसंकुल प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे येथील १०८ फ्लॅटधारकांवर आलेले बेघर होण्याचे संकट तात्पुरते टळले आहे.
सिडकोच्या आरक्षित भूखंडावर बिल्डर विनायक कोळी आणि विवेक देशमुख यांनी उभारलेल्या चार बेकायदेशीर इमारतींना ११ वर्षांनी न्यायालयीन आव्हान मिळाले. या प्रकरणात थेट रहिवाश्यांच्या माथी कारवाईची तलवार कोसळली आहे.
२७ जून रोजी सिडकोचे पथक पोलिस बंदोबस्तात इमारतींची पाहणीसाठी आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आठ आठवड्यांच्या स्थगिती आदेशामुळे कारवाईला थांबा मिळाला आणि रहिवाशांना श्वास घेण्यासाठी थोडा अवकाश मिळाला.
दरम्यान, सिडकोने सर्वोच्च न्यायालयात सर्व आवश्यक कागदपत्रं दाखल केल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी भारत ठाकूर यांनी दिली. नोव्हेंबरमधील सुनावणीनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार आहे. त्यामुळे उरणसह १०८ कुटुंबीयांचे डोळे आता सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहेत.
