पदाधिकारी नियुक्त्यांनंतर जुन्या कार्यकर्त्यांचा संताप; दसऱ्यानंतर सीमोल्लंघनाची तयारी
माणगाव | सलीम शेख
माणगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर पक्षाच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा भडका उडाला आहे. दसऱ्यानंतर या नाराज कार्यकर्त्यांकडून ‘सीमोल्लंघन’ होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरातील नाक्यानाक्यावर सुरू आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक?
सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी माणगाव येथील कुणबी भवनात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांपूर्वी जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
जुने कार्यकर्ते म्हणतात, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे व एकनिष्ठतेने काम केले. निवडणुका असोत वा इतर कार्यक्रम, आम्ही नेहमी पक्षासाठी झटत आलो. नगरपंचायतीच्या निवडणुकीत सुरक्षित वॉर्ड नसतानाही आम्ही पक्षाच्या झेंड्याखाली उभे राहिलो. मात्र गेल्या काही वर्षांत नेतृत्व आमच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे आणि नव्यांना प्राधान्य दिले जात आहे. यामुळे मनात खोलवर नाराजी निर्माण झाली आहे.”
गेल्या काही महिन्यांपासून माणगाव शहरात पक्षांतर्गत धुसफूस सुरू होती. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे ही धुसफूस अखेर उघड झाली आहे. जुन्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की नेतृत्वाने “जुने ते सोने” या तत्त्वाला फाटा देत नव्या लोकांना संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
दसऱ्यानंतर सीमोल्लंघनाची तयारी
काही नाराज कार्यकर्त्यांनी माध्यमांशी अनौपचारिक बोलताना “आम्ही दसऱ्यानंतर दुसरी चूल मांडण्याची तयारी करत आहोत. पक्षाने आमच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले आहे. नेतृत्व नव्या लोकांच्या मागे जास्त लक्ष केंद्रित करत असून आम्हाला हिणवले जात आहे. त्यामुळे आता आमचा पर्याय ठरवावा लागेल” असे स्पष्ट संकेत दिले.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माणगाव शहरातील गटबाजी ठळकपणे समोर आली आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र “लवकरच माणगावकरांना आमची दिशा दिसेल” असे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे दसऱ्यानंतर माणगावच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत.
