श्रीवर्धन (प्रतिनिधी) : श्रीवर्धन तालुक्यातील अनिकेत मोहित यांची ‘दादासाहेब फाळके चित्रपट युनियन’ (DSPC युनियन) च्या रायगड जिल्हा विभागातील ‘डिजिटल अँड प्रिंट मीडिया सेल’ मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२८ सप्टेंबर २०२५ रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. युनियनचे अखिल भारतीय अध्यक्ष अजित म्हामुणकर यांच्या स्वाक्षरीने आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष आमले यांच्या शिफारशीवरून नियुक्तीपत्र जारी करण्यात आले.
या नियुक्तीद्वारे अनिकेत मोहित यांना रायगड जिल्ह्यातील डिजिटल व प्रिंट मीडियाशी संबंधित कामकाजात सक्रिय भूमिका बजावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. युनियनची उद्दिष्टे व कार्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम ते करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
गौरवाची बाब म्हणजे दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ही भारत सरकारच्या ‘ट्रेड युनियन ॲक्ट, १९२६’ अंतर्गत नोंदणीकृत संघटना आहे. देशभरातील चित्रपट उद्योगातील निर्माते, मालक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या हक्कांसाठी व प्रश्नांसाठी युनियन सातत्याने कार्यरत आहे.
अनिकेत मोहित यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल स्थानिक स्तरापासून चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
