अनंत नारंगीकर (उरण)
उरण तालुक्यात खारफुटीची जंगलं कापून खाजगी व्यवसायिकांना गोदामे उभारण्यास शासकीय परवानगी दिली जात असतानाच, उरणकरांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मात्र सीआरझेड परवानगीच्या अभावामुळे रखडले आहे. या विरोधाभासामुळे जनतेत संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रुग्णालयाची प्रतीक्षा दोन दशकांची
२०१० मध्ये झालेल्या आंदोलनानंतर शासनाने उरणमध्ये १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरात भूखंड देण्यात आला आणि तब्बल ५८ कोटींचा निधीही मंजूर झाला. मात्र हा भूखंड सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने रुग्णालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
रुग्णांची दुर्दशा कायम
उरणमध्ये अद्याप एकाही शासकीय किंवा खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग (ICU) उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर आजारी रुग्ण व अपघातग्रस्तांना पनवेल किंवा नवी मुंबईकडे हलवावे लागते. अनेक वेळा रुग्णांचा प्रवासातच मृत्यू होतो. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसेंदिवस वाढणारा ताण यामुळे उरणकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह
खाजगी गोदामांसाठी खारफुटीची कत्तल चालू असताना, त्याच खारफुटीचे कारण पुढे करून उपजिल्हा रुग्णालयाला अडथळा आणला जात आहे. “उरणसारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात आरोग्यसेवेची अशी दुर्दशा असणे ही खरोखरच शोकांतिका आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटू लागली आहे.
प्रशासनाची भूमिका
“सिडकोच्या बोकडविरा परिसरातील मंजूर भूखंडावर खारफुटी असल्याने सीआरझेड परवानगी अभावी रुग्णालयाचे काम रखडले आहे. मात्र १०० खाटांच्या रुग्णालयासाठी ५८ कोटींचा निधी मंजूर असून आवश्यक परवानग्या मिळाल्यास काम तातडीने सुरू करता येईल,” अशी माहिती डॉ. राजेंद्र इटकरे, तालुका आरोग्य अधिकारी, उरण यांनी दिली.
