माणगाव । सलीम शेख
माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कशेणे शाळेत कार्यरत सहाय्यक शिक्षिका अपूर्वा अमोल जंगम यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२४-२५ या वर्षातील मानाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिक्षण संचालक महेश पालकर तसेच पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि १ लाख १० हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना अपूर्वा जंगम यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या या यशाचे माणगाव तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून स्वागत होत असून विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था (ता. माणगाव) यांनी विशेष अभिनंदन समारंभ आयोजित करून त्यांना पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अपूर्वा जंगम या माणगाव शहरातीलच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. गेली सहा वर्षे त्या रायगड जिल्हा परिषद शाळा, कशेणे येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीसाठी शालेय शिक्षणासोबतच त्यांच्यात संस्कारक्षम मूल्ये रुजावीत, यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतात. शालेय कार्यक्रमांत ग्रामस्थांचा सहभाग वाढवून त्या समाजाशी घट्ट नाते जोडतात. वृक्षारोपण, रॅली, सांस्कृतिक उपक्रम, शैक्षणिक जनजागृती मोहिमा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांना प्रोत्साहित करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
त्यांचा आवाज सुरेल असल्याने त्या अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांत निवेदिका म्हणूनही लोकप्रिय आहेत. आपल्या सहजसुंदर सादरीकरणामुळे त्यांनी अनेक व्यासपीठांवर मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माणगाव तालुक्यात उत्तम निवेदिका आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. याशिवाय त्या दरवर्षी माणगाव शहरात आयोजित शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान करतात आणि इतर महिलांनाही यासाठी प्रोत्साहित करतात.
पुरस्कार मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अपूर्वा जंगम म्हणाल्या की, “या पुरस्कारासोबत मिळालेल्या १ लाख १० हजार रुपयांच्या बक्षीस रकमेपैकी २५ हजार रुपये माझ्या कार्यभूमी असलेल्या कशेणे शाळेसाठी दान करणार आहे. उर्वरित ८५ हजार रुपयांचे बँक सर्टिफिकेट काढून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत किंवा वृद्धाश्रमात गरजेच्या वस्तूंचे वाटप करणार आहे.” त्यांच्या या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
अपूर्वा जंगम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना बहाल केलेला हा सन्मान माणगाव तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. एक उपक्रमशील, प्रेरणादायी आणि सेवाभावी शिक्षिका म्हणून त्यांची कार्यशैली इतर शिक्षक व समाजासाठी निश्चितच आदर्श ठरणारी आहे.
