• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्ह्यातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत -खासदार सुनिल तटकरे

ByEditor

Oct 1, 2025

रायगड : जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरु असून सुरु असलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत,असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन भवन हॉल येथे आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी सत्यजित बडे आदि उपस्थित होते.

खासदार सुनील तटकरे म्हणाले की, वडखळ-अलिबाग रस्त्याचे काम, बेलकडे मार्गे अलिबाग-रोहा रस्त्याची प्रलंबित असलेली कामे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. त्याचप्रमाणे राजेवाडी ते म्हाप्रळ या नॅशनल हायवेच्या कामामध्ये काही अडी-अडचणी असतील तर त्या सोडवून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे. मुंबई-गोवा हायवेवरील इंदापूर व माणगाव येथील बायपासची कामेपण सुरु करावीत. नातेखिंड ते रायगड हा रस्ता जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असून तेथील कामे प्रलंबित असतील तर ती कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. मुरुड तालुक्यात मोठ्याप्रमाणावर पर्यटक येत असतात त्यामुळे साळाव ते मुरुड रस्ता तसेच रोहा ते आगरदांडा रस्त्याची कामे पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे कृषी अधिकारी व तलाठी यांनी संयुक्त पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. सर्पदंश लस, डायलेलीसच्या सुविधाही उपलब्ध ठेवाव्यात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!