अलिबाग । प्रतिनिधी
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने एक मोठा टप्पा गाठत ९३५ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करून रायगड जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी आदर्श पतसंस्थेचा २७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यापूर्वीच या पतसंस्थेने ९३५ कोटींचा व्यवसाय करत जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर झेप घेतल्याची घोषणा करण्यात आली. या यशाबद्दलचा विशेष कार्यक्रम बुधवारी (दि. १) अलिबाग येथील आदर्श भवनात पार पडला. या कार्यक्रमात पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.
सुरेश पाटील म्हणाले की, “मार्च २०२५ मध्ये १००० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचा संकल्प आम्ही केला होता. त्यामुळे संस्थेमध्ये वातावरण निर्मिती झाली. कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आज आम्ही ९३५ कोटींचा टप्पा पार करू शकलो आहोत. मार्च २०२६ पर्यंत १००० कोटी रुपयांचा व्यवसाय गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी कसलीही तडजोड केली जाणार नाही.”
कार्यक्रमात सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कोणत्याही आर्थिक संस्थेची प्रगती ही तिच्या ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून असते. आदर्श पतसंस्थेने ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे, म्हणूनच ही संस्था आज रायगड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मात्र हा क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता पाटील क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि वात्सल्य ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. शोभा जोशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमात आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक मंडळातील सतीश प्रधान, रामभाऊ गोरीवले, संजय राऊत, ॲड. वर्षा शेठ, ॲड. रेश्मा पाटील, विलाप सरतांडेल, डॉ. मकरंद आठवले, ॲड. आत्माराम काटकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याधिकारी उमेश पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या भव्य उपक्रमामुळे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ही केवळ एक वित्तीय संस्था न राहता ग्राहकांचा विश्वास जपणारी आणि सातत्याने प्रगती करणारी संस्था म्हणून रायगड जिल्ह्यात आपली वेगळी छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे.
