• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नगरपालिका निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी

ByEditor

Oct 1, 2025

मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून आता नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या अंतर्गत राज्यातील एकूण 247 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी सदस्यपद तसेच थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावांबाबत हरकती अथवा सूचना दाखल करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून 28 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीच नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

मतदार याद्यांमध्ये नावांचा नवीन समावेश, नावे वगळणे किंवा पत्त्यातील बदल अशा मूलभूत कार्यवाहीचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. कारण या यादी थेट विधानसभा मतदार यादीवर आधारित असतात.
मात्र, लेखनिकांच्या चुकीमुळे प्रभाग बदलणे, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव न दिसणे किंवा नावे चुकीच्या ठिकाणी नोंदवली जाणे अशा त्रुटींविषयी नागरिकांना हरकती नोंदवता येतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या निवडणुकांमधील मतदार याद्यांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखला असून, 8 ऑक्टोबरपासून सुरू होणारी प्रक्रिया 28 ऑक्टोबरला अंतिम टप्प्यात पोहोचेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!